शिरुर जिंकणारच, पण नवीन पक्षात जाऊन? आढळरावांची नव्या पक्षप्रवेशाची तयारी? जाणून घ्या…

शरद पवार यांच्यापासून लांब गेल्यानंतर अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या ताब्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा डाव सुरू केला आहे. यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघाची दिवसेंदिवस अधिकच चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे नेते आढळराव पाटील हे याठिकाणी इच्छुक आहेत.

असे असताना त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कोण लढणार, अशी चर्चा सुरु होती. यामध्ये प्रदीप कंद हे अचानक चर्चेत आले आहेत. मात्र त्यांचा निभाव किती लागणार यावर प्रश्नचिन्ह आहे.

कंद यांनी वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यास लोकसभा लढवू, असे सांगितले होते. मात्र आता आढळराव पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर लोकसभाही लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे.

असे असताना ते लवकरच एकनाथ शिंदे यांचा हात सोडून अजितदादांचे ‘घड्याळ’ हाती बांधणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. यामुळे ते आता कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेतील, असेही सांगितले जात आहे.

याबाबत त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शिंदेंचा दिग्गज नेता राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर काल शिंदे आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये हा विषय असल्याची माहिती आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांच्याकडे तुल्यबळ असा उमेदवार नाही. त्यात आढळराव पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे. यामुळे तेच अजित पवार यांच्याकडे येतील असे म्हटले जात आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे यांना तगडी मात देणारा नेता म्हणजे आढळराव पाटील हेच पर्याय आहेत. यामुळे त्यांचा विचार शेवटपर्यंत होणार आहे. यामुळे आता शेवटी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.