तो अपघात नव्हे हत्या! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मुलानेच केली आई-वडील अन् भावाची हत्या…

हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणात घातपात झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून मुलानेच आई, वडिल व भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, अनैतिक संबंधाला होणाऱ्या विरोधातून त्याने तिघांचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलास अटक केली आहे. डिग्रसवाणी शिवारात तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आले होते. कुंडलिक जाधव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता.

त्याची आई कलावती बाई त्यांच्या सोबत होत्या. पुढे एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचे मुलाने सांगितले होते.

असे असताना घटनास्थळावर संशयास्पद बाबी पुढे आल्या होत्या. यामुळे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे तपास सुरू होता.

कुंडलीक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलीक जाधव (६०), आकाश कुंडलीक जाधव (२५) अशी मयतांची नावे आहेत. पोलीस पथकाने घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन पाहणी केली. तीनही मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली दिसून आल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाच चुकचुकली.

पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात टाकून दिले व अपघाताचा बनाव केल्याचे चौकशीमध्ये सांगितले. महेंद्र जाधव याचे गावात एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

त्या संबंधाला त्याचे वडिल कुंडलीक जाधव, आई कलावती जाधव व भाऊ आकाश जाधव यांचा विरोध होता. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.