अजित पवार चारही बाजूने अडकले! बारामतीत आता महायुतीचाच अजून एक बडा नेता विरोधात उभा राहणार…

सध्या बारामती लोकसभा निवडणुकीत काहीही करून विजय मिळवायचा असा पण केलेले अजित पवार अडचणीत आले आहेत. याचे कारण म्हणजे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी आता दादांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

अजितदादांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवतारेंना पराभवाची धूळ चारली होती. शिवतारे कसे निवडून येतात पाहतोच असं म्हणून अजित पवारांनी त्यांना पराभूत केले होते. आता यावर शिवतारे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

याबाबत ते म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचा समाचार घेतला आहे.

लोकसभेची निवडणूक समोर आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा ताई. चाललंय ना. अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा काही कोणाचा सातबारा नाही, की सतत बारामतीचा ५० वर्ष खासदार पाहिजे. पुरंदरचा पाहिजे. भोरचा पाहिजे. का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं.

पाच-पाच वेळा, दहा-दहा वेळा. काय मिळालं आम्हाला. या पालखी तळावर विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी. स्वाभिमानी जनतेचा अपमान केलाय. तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. असं विजय शिवतारे म्हणाले.

तसेच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता येणाऱ्या काळात बारामतीमध्ये काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी अनेकजण अजित पवारांच्या विरोधात जात आहेत.