अजित पवारांच्या बंडामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेना-भाजपसोबत जाऊन हातमिळवणी केली आहे. तसेच या सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली आहे. त्यामुळे राज्याचे वातवरणही चांगलेच तापले आहे.
अजित पवारांच्या या बंडानंतर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी अजित पवारांसोबतच शिंदे गटातील नेत्यांवर आणि भाजप नेत्यांवरही जोरदार टीका केल्या आहे. अजित पवारांचं बंड हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या भाजपने त्यांनाच आता सत्तेत सोबत घेतल्यामुळे भाजपवर टीका केली जात आहे. अशात आता एका प्रसिद्ध वकिलाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काही गंभीर आरोप केले आहे.
सध्याच्या राजकारणात जे सुरु आहे ते असंवैधानिक आहे. हे अतिशय चुकीचं आहे. घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्याला अशा राजकीय घटनांना चाणक्यनिती म्हटले जात असेल. तर ही चाणक्यनिती मतदारांच्या विरुद्ध आहे, असे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
असीम सरोदे यांनी यावेळी बोलताना फडणवीसांवर आरोप केले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील राजकारण नासवले आहे. ते अत्यंत विद्रूप राजकीय चेहरा म्हणून समोर आले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, आधीच फडणवीसांनी शिंदेसोबत मिळून घटनाबाह्य सरकार स्थापन केले. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर हे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्यामुळे हे सरकार अजून टीकून आहे. पण काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील.
सध्या शरद पवार यांच्याच बाजूने संविधान आहे. त्यांच्याच बाजूने सर्व कायदेशीरबाबी होऊ शकतात. ते पक्षाचे प्रमुख आहे. त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद आणि प्रदेशाध्यक्षांनाच महत्व आहे, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.