Balloon Cylinder : फुगा खरेदीचा हट्ट चिमुकल्याच्या जीवावर बेतला, सिलिंडरच्या स्फोटात जागीच मृत्यू…

Balloon Cylinder : नागपुरात एक भयानक घटना घडली आहे. बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात फुग्यांच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

याबाबत तपास सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर फुगेविक्रेता फरार झाला आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळच्या मैदानावर नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी फुगे विक्रेते असतात.
क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान आपल्या मावशीसोबत मैदानावर फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा ही घटना घडली आहे. सिझान आसिफ शेख असे सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

तसेच यामध्ये फरिया हबीब शेख आणि अनमता हबीब शेख असे जखमी महिलांची नावे आहेत. फारिया व अनमता सिझानच्या मावशी आहेत. याठिकाणी एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता.

दरम्यान, सिझानने फुगा खरेदीचा मावशीकडे हट्ट धरला. फुगेवाल्याच्या बाजूला ते सगळे उभे असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे मोठी पळापळ झाली. घटनेत सिलिंडर उंच हवेत उडाला. आग लागल्याने सिझान गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचे निधन झाले होते.

फरिया व अनमता यांनाही सिलिडर लागल्यामुळे दुखापत झाली. घटनेनंतर फुगेवाला याठिकाणी थांबला नाही. तो फरार झाला. यामुळे मात्र मोठी खळबळ उडाली. पोलीस याबाबत तपास करत आहेत.