महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले असून, विरोधी पक्षांची ताकद विधानसभेत मर्यादित झाली आहे. महायुतीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होणार असून, या अधिवेशनात नवनिर्वाचित 288 आमदारांना अस्थायी अध्यक्ष कालीदास कोळमकर शपथ देणार आहेत. विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
तसेच, राज्यपालांचे अभिभाषण हा कार्यक्रमही होईल. महायुतीच्या विजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांची संख्या अर्धशतकाच्या आतच थांबली आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या राजकीय घडामोडींच्या दरम्यान जळगावचे माजी पालकमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांच्याबद्दल चर्चा रंगली आहे.
ते शरद पवार गट सोडून अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सूत्रांनी याबाबत संकेत दिले आहेत. गुलाबराव देवकर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या आगामी भूमिकेबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना, देवकर यांच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात चुरशीची लढत झाली होती.
मात्र, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेमुळे अजित पवार गटाची ताकद उत्तर महाराष्ट्रात वाढणार असल्याची चर्चा आहे. आगामी काळात त्यांच्या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.