महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीसाठी केवळ काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार वर्षा बंगल्यावर दाखल झाले असून, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला आहे.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एकनाथ शिंदे तासाभरात निर्णय घेतील. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी चंपासिंह थापा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. त्यांना प्रशासनात राहून काम सुरू ठेवावे लागेल. तीन पक्षांनी मिळून आगामी पाच वर्षांतही चांगले काम करावे,” असे थापा यांनी सांगितले.
चंपासिंह थापा यांची बाळासाहेब ठाकरेंशी असलेली खास नाळ सर्वपरिचित आहे. नेपाळहून भारतात आलेल्या थापा यांनी 1980-85 दरम्यान बाळासाहेबांच्या विश्वासू मदतनीसाची भूमिका स्वीकारली. बाळासाहेबांचे दिनचर्येचे व्यवस्थापन आणि सेवा यात थापांनी आपले आयुष्य वाहून घेतले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर थापा यांनी एकनाथ शिंदेंना आपला पाठिंबा दिला.
शिवसेनेच्या गटबाजीच्या काळातही चंपासिंह थापा यांनी शिंदे गटाला पाठिंबा देऊन राजकीय वळण दिले. त्यामुळे राजकीय समीकरणे एकनाथ शिंदेंच्या बाजूने असल्याचे तेव्हा दिसले. आता एकनाथ शिंदेंच्या आगामी निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.