लोकसभेवर निवडून गेल्यामुळे राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे यासाठी भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून या दोन जागांसाठी ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.
या जागांवर भाजप एक जागा राष्ट्रवादीला देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही जागा भाजपच्या असल्या तरी पण देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला आम्ही एक जागा देऊ, असं वक्तव्य केलेलं आहे. यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून रावसाहेब दानवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून माजी आमदार बाबा सिद्दीकी तसेच साताऱ्यातील नितीन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. दोघांकडून भेटीगाठी वाढल्या आहेत. अंतिम निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस घेतील.
अल्पसंख्याक समाजातील व्होट बँक पुन्हा एकदा मिळवण्यासाठी अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांचे नाव पुढे केले असल्याचे सांगितले जात आहे. शेवटच्या क्षणी बाबा सिद्धीकी यांना राज्यसभेची लॉटरी लागण्याची जास्त शक्यता आहे. तसेच नितीन पाटील हे सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत.
अजित पवारांनी उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत करा, आम्ही तुमच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार करू असा शब्द त्यांनी दिला असल्याचीही माहिती आहे. यामुळे नेमकं कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रावसाहेब दानवे यांच्या सागर बंगल्यावरच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत.
यामुळे त्यांचं नाव अंतिम झालं असल्याची देखील माहिती आहे. रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मराठा मतदारांची भाजपवर असलेली नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती आहे. येत्या काही यामध्ये कोणाचे नाव पुढे येणार का हे लवकरच समजेल.