राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अजित पवारांसह ९ नेत्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सुद्धा पार पडला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाकडून गेल्या वर्षभरापासून अजित पवारांवर टीका केली जात होती. अजित पवार हे आम्हाला निधी देत नव्हते, ते शिवसेना संपवत होते, असे शिंदे गटाचे आमदार म्हणत होते. पण आता त्याच राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतल्यामुळे शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.
अशात अजित पवारांना सरकारमध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. आता या सर्व गोष्टींवर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटातील आमदार नाराज असणारच. कारण ज्याला एक भाकरी खायला मिळणार होती. त्याला आता अर्धीच भाकरी मिळणार आहे. पण ही वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
अजित पवारांच्या आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडून कोणलाच माहिती नव्हते, असे लक्षात येत आहे. त्यामुळे आपल्याला पूर्वकल्पना न दिल्यामुळे शिंदे गटातील आमदार भाजपवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांनासोबत घेण्याची काय गरज होती? असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशात आमदार नाराज असल्यामुळे एकनाथ शिंदेही चिंतेत असून ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.