Prithvi Shaw : कोण होतास तू काय झालास तू? क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा ‘तो’ Video पाहून चाहत्यांना बसला धक्का

Prithvi Shaw : भारतीय संघाबाहेर असलेला मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ आयपीएल (IPL-2024) च्या पुढील हंगामात खेळताना दिसणार आहे. दरम्यान, त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो नेटवर सराव करत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. 24 वर्षीय पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो. पुढच्या मोसमातही तो खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे.

त्यासाठी त्यानी तयारीही सुरू केली आहे. मात्र, त्याचा फिटनेस पाहून लोकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. वास्तविक, पृथ्वीचे वजन लक्षणीय वाढले आहे. व्हिडिओमध्ये त्याचे वजन खूप जास्त असल्याचे दिसत आहे.

पृथ्वीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या हँडल्सने शेअर केला आहे. अनेक युजर्सनी व्हिडिओवर कमेंटही केल्या. एकाने तर त्याला ‘फॅटमॅन’ असे लिहिले. आणखी एका युजरने लिहिले – 25 व्या वर्षी एथलीट इतका अनफिट कसा असू शकतो?

पृथ्वी शॉ गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. 2021 मध्ये त्याने कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्याने 2018 मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने 5 सामन्यात 1 शतक आणि 2 कसोटीत अर्धशतकांसह 339 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने 6 सामन्यात केवळ 189 धावा केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तो एक सामना खेळला पण त्यात त्याला खाते उघडता आले नाही.