दिल्लीतील रात्री मोठ्या घडामोडी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं? ठाकरे म्हणाले..

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे दिल्लीत अनेक नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रात्री दिल्लीत जाऊन अमित शहा यांनी भेट घेतली. यामुळे ते देखील भाजपा युतीत येतील असे सांगितले जात आहे.

गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यातच ठेवले आहे. यामुळे याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या भेटीबाबत राज ठाकरे यांना दिल्लीतील काही पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्यात काही अनौपचारिक संवाद झाला. भेटीचं कारण आपल्यालाही ठाऊक नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मला फक्त या म्हणाले, असेही ठाकरे म्हणाले. इतर वेळी राज ठाकरे यांच्या घरी सगळे नेते येतात. आता मात्र राज ठाकरे स्वतः दिल्लीत गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे)- राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या महायुतीत सामील होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यामुळे गाठीभेटी सुरू आहेत. मनसेला लोकसभेची एक जागा देखील मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरे हे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आधीच दिल्लीत पोहोचले आहेत. अमित शाह यांच्या निवासस्थानी ‘राज-ए-शाही’ बैठक झाली.

दरम्यान, राज ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर त्यांना कोणती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई आणि नाशिक याठिकाणी ते जागा मागतील असेही सांगितले जात आहे. यामुळे महायुतीत काहीजण नाराज देखील होण्याची शक्यता आहे.