महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आता मविआने विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. उत्तर महाराष्ट्रातून शरद पवार यांनी दोन खासदार निवडून आले आहेत. यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय परिस्थिती देखील महाविकास आघाडीला अनुकूल असल्याने पवार गटात जाण्याचा अजित पवार गटातील आमदाराचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील याबाबत वक्तव्य केले आहे.
राज्यात लोकसभेच्या 13 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सध्या मोठा भाऊ ठरला आहे. असे असतानाही काँग्रेसचा एक नाराज आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती समोर येतं आहे. यामुळे हा आमदार नेमका कोण अशी चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा आहे. हे दोन आमदार कोण आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र येणाऱ्या काळात त्यांची नावे देखील पुढे येतील. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटाका बसला आहे.
त्या तुलनेत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले आहे. राज्यात भाजपच्या 9 जागा आल्या आहेत. तर, अजित पवार गटाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. शिंदे गटाचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे आता महायुतीला राज्यात सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.