मुंबईत महिला डॉक्टरने संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी चर्चच्या फादरकडे दिली चिठ्ठी, भयानक कारण आले समोर

वसईतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे ३९ वर्षीय महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी आत्महत्या केली आहे. त्या कार्डिनल ग्रेशस रुग्णालयात फिजिओथेरेपिस्ट म्हणून कार्यरत होत्या. डॉ. डेलिसा यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले. विशेष म्हणजे, नुकतीच त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

आत्महत्येपूर्वी डेलिसा यांनी एक चिठ्ठी चर्चच्या फादरकडे सोपवली होती, ज्यातून त्यांच्या आत्महत्येचे कारण उघडकीस आले आहे. त्यांनी आपल्या पती रॉयल परेरा याच्यावर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला असून, त्याच्या शारीरिक आणि मानसिक छळामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

या प्रकरणात वसई पोलिसांनी डॉ. डेलिसा यांचे पती रॉयल परेरा याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची डॉक्टर डॉ. डेलिसा परेरा या वसईतील सोनारभाट परिसरात पती आणि १२ वर्षांच्या मुलीसोबत राहत होत्या. त्यांनी विवाहित महिलांसाठी आयोजित मिसेस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

आत्महत्या करण्यापूर्वी डेलिसा पापडी येथील चर्चमध्ये गेल्या आणि फादरकडे एक लिफाफा सोपवला. फादरने हा लिफाफा डेलिसा यांच्या आईला दिला, ज्यातून आत्महत्येचे कारण स्पष्ट सुसाईड नोटमध्ये डेलिसा यांनी पतीच्या एका महिलेबरोबरच्या अनैतिक संबंधांचा उल्लेख केला आहे.

तसेच, २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत पतीने केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळामुळे त्यांनी आयुष्य संपवले, असे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर रॉयल परेरा याला अटक करण्यात आली आहे.