दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप करत दोन दिवसांत त्यांच्या विजयाची पोलखोल करण्याचा दावा केला आहे. दिल्ली विधानसभेत बोलताना त्यांनी भाजपवर निवडणुकीत गैरप्रकार केल्याचे आरोप केले.
केजरीवाल म्हणाले, “माझ्याकडे भाजपच्या कटाचे पुरावे आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणातील विजय कसा मिळवला याचे साक्षीदारही मिळाले आहेत. हे पुरावे मी संपूर्ण देशासमोर उघड करणार आहे.”
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार असताना, केजरीवालांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एक्झिट पोलनुसार पराभवाचे संकेत असतानाही सत्ता कायम ठेवली.
तसेच, महाराष्ट्रातही महायुतीने प्रचंड यश मिळवत २८८ पैकी २३४ जागा जिंकल्या. या निकालांमुळे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
केजरीवाल यांनी भाजपवर थेट हल्ला चढवताना सांगितले की, “दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यास वीज कंपन्या अदानींना दिल्या जातील, ज्यामुळे दिल्लीकरांचे वीज बिल भरताना हाल होणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला, मात्र मी नकार दिल्यामुळेच मला तुरुंगात डांबले गेले,” असे त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.