राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर अखेर पडदा पडला आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या महायुती 2.0 सरकारच्या शपथविधीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिंदे यांचा शपथविधी सोहळा पार पडेल.
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली होती, परंतु भाजपने ती मान्य केली नाही. नाराजीच्या वातावरणात शिंदे आजारी पडल्याची चर्चा होती. यानंतर फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. शिंदे यांच्या मागण्यांवर वरिष्ठ पातळीवर तोडगा काढण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
महसूल खाते शिंदे गटाला देण्याचा प्रस्ताव पुढे आला, तसेच त्यांच्या गटाला निवडणुकीत बळ मिळवून देण्यासाठी भाजपने सकारात्मक भूमिका घेतली. यामुळे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला.
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी तीन भव्य मंच तयार करण्यात आले आहेत. भगव्या रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करून हिंदुत्वाची छटा दाखवण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची निवड केली आहे. महायुती सरकारच्या भविष्यातील राजकीय दिशेवर लक्ष केंद्रित करून या मंत्रीपदांची निवड केली आहे. तब्बल 12 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार आहे, ज्यात महायुतीचे एकत्रित नेतृत्व पाहायला मिळणार आहे.