ताज्या बातम्याआरोग्य

Dombivli : 2 वर्षाचा चिमुरडा पडला तिसऱ्या मजल्यावरून खाली अन् घडला चमत्कार, CCTV Video पाहून व्हाल हैराण

Dombivli : डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात शनिवारी (२५ जानेवारी) एक हृदयद्रावक प्रसंग घडला, ज्यात भावेश म्हात्रे या ३५ वर्षीय युवकाने प्रसंगावधान राखत एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव वाचवला. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून, भावेशच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तीन मजल्यावरून बाळ पडले, पण धाडसाने वाचले प्राण

अनुराज इमारतीत रंगकाम सुरू असल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील खिडकीच्या काचा काढून ठेवण्यात आल्या होत्या. याच घरात खेळत असलेला दोन वर्षांचा सात्विक देसले अचानक उघड्या खिडकीतून खाली पडला. त्याचवेळी ग्राहकांना घर दाखवून बाहेर येत असलेला भावेश म्हात्रे हा मागे वळून बोलत असताना, त्याने बाळ खाली पडताना पाहिले.

भावेशने क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला. बाळ त्याच्या हातातून निसटले तरी त्याने तात्काळ पाय पुढे करत बाळाला पायावर झेलले. त्यामुळे बाळ थेट जमिनीवर आदळला नाही. हा झटका सौम्य राहिल्याने बाळाचा जीव वाचला.

सुखरूप असल्याने पालकांचा जीव भांड्यात

बाळ जमिनीवर पडताच आई-वडिलांसह उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी बाळ सुखरूप असल्याचे सांगताच पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. भावेशच्या या तात्काळ कृतीमुळे मोठा अनर्थ टळला.

परिसरातून भावेशचे कौतुक; व्हिडिओ व्हायरल

भावेशच्या या धाडसाचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. देवासारखा माणूस ठरलेल्या भावेशने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात्विकच्या आई-वडिलांसह डोंबिवलीकरही त्याचे आभार मानत आहेत.

“मी फक्त कर्तव्य केले,” भावेशची नम्र प्रतिक्रिया

भावेशने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी काही मोठं केलं नाही, जे समोर होतं त्यावर तात्काळ कृती केली. बाळ सुखरूप आहे, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

भावेशच्या या कार्याने माणुसकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे, ज्यामुळे त्याच्यावर डोंबिवलीत कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Back to top button