Uddhav Thackeray : ३० वर्षांहून जास्त काळ साथ देणाऱ्या मुंबईतील बड्या नेत्याने सोडली ठाकरेंची साथ, शिवसेना शाखेलाही लावलं कुलूप

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करताच मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षांतर करण्यापूर्वी त्यांनी वर्सोवा येथील शिवसेना शाखेला टाळं ठोकले आणि चावी स्वतःकडेच ठेवली. यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

शाखेच्या ताब्यावरून संघर्ष

राजूल पटेल या अंधेरी-वर्सोवा भागातील कट्टर शिवसैनिक मानल्या जातात. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी पूनम गार्डन परिसरातील शाखेला टाळं लावल्याने दोन्ही गट आता आमनेसामने आले आहेत. या शाखेचा ताबा मिळवण्यासाठी संघर्ष पेटला आहे.

अनिल परब यांची टीका, पटेल यांचा प्रतिवाद

शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राजूल पटेल यांनी २४ तासांत शाखा खाली करावी, अन्यथा ती ताब्यात घेतली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. “शिवसेनेमुळे ओळख मिळालेल्या लोकांनी शेवटी गद्दारी केली. हे त्यांनी पैशासाठी केले की दुसऱ्या कारणासाठी, हे त्यांनाच माहीत,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, राजूल पटेल यांनी यावर प्रत्युत्तर देताना सांगितले की, “१९९७ मध्ये नगरसेविका झाल्यानंतर चार लाख रुपये देऊन ही जागा विकत घेतली होती. १९९९ पासून त्या जागेचे वीजबिल माझ्या नावावर आहे. शाखेसाठी कोणी मार खाल्ला असे म्हणत असेल, तर त्याने पुरावा द्यावा,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “ही शाखा मी स्वतः बांधली आहे, इतर लोकांप्रमाणे कार्यालय थाटलेले नाही,” असा दावा करत शाखेची मालकी स्वतःची असल्याचे सांगितले.

मिरा-भाईंदरमध्येही संघर्ष पेटला

या घटनेनंतर मिरा-भाईंदरमध्येही शिवसेनेच्या शाखेच्या ताब्यावरून वाद उफाळला आहे. ठाकरे गटातील एक पदाधिकारी शिंदे गटात गेल्यानंतर त्यांनी शाखेवर दावा केला, त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. मिरा रोड येथील एस. के. स्टोन परिसरात या वादामुळे मोठा तणाव निर्माण झाला आणि पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

शाखेच्या ताब्यावरून शिंदे गटाचे शिवशंकर तिवारी आणि ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांच्यात जोरदार वाद झाला. तिवारी यांनी शाखेची उभारणी व देखभाल आपणच केल्याचा दावा केला, तर ढवण यांनी शिंदे गटावर बळजबरीचा आरोप केला.

शाखांवरील संघर्षामुळे वातावरण तापले

मुंबई आणि उपनगरांमध्ये ठाकरे व शिंदे गटामध्ये शाखांच्या ताब्यावरून संघर्ष तीव्र होत चालला आहे. शिवसेनेच्या स्थानिक पातळीवरील वर्चस्वासाठी हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.