Solapur : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने विवाहितेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा कट रचला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. पतीला संपवण्याच्या प्रयत्नात प्रियकराचाही दुर्दैवी शेवट झाला. या दुहेरी हत्याकांडाचा छडा अखेर पांगरी पोलिसांनी लावला असून, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
तलावात उडी मारताना प्रियकरही बुडाला
ही घटना बार्शी तालुक्यातील महागावजवळील ढाळे पिंपळगाव तलावात 18 फेब्रुवारी 2025 रोजी घडली. गणेश अनिल सपाटे (26, रा. अलीपूर रोड, बार्शी) आणि रूपाली शंकर पटाडे (35) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे—गणेशने रूपालीच्या पती शंकर पटाडे (40) याला तलावात फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पडताना शंकरने गणेशलाच गळा धरून घेतला आणि दोघेही पाण्यात बुडाले.
सुखी संसारात अनैतिक नात्याची ठिणगी
रूपाली आणि शंकर यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना दोन मुलंही होती. शंकर वाहनचालक होता, तर रूपाली गृहिणी होती. काही काळ त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, पण नंतर गणेश सपाटे हा तिच्या आयुष्यात आला. या संबंधामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. शंकरने अनेकदा रूपालीला गणेशपासून दूर राहण्याचा सल्ला दिला, पण तिने ऐकले नाही. उलट, तिने आणि गणेशने मिळून शंकरला संपवण्याचा कट रचला.
दारू पार्टीत सुरू झाला कट… आणि तलावात झाला शेवट
18 फेब्रुवारी रोजी गणेशने शंकरला दारू पार्टीसाठी बोलावले. सोबत गणेशचे दोन मित्रही होते. दारू प्यायल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शंकरला महागाव येथील तलावावर नेण्यात आले. गणेशने शंकरला पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र, शंकरने त्याला घट्ट पकडून घेतले. त्यामुळे दोघेही तलावात पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
साक्षीदाराच्या माहितीनंतर पोलिसांनी लावला छडा
सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटत होता, मात्र एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना खरी माहिती दिली. त्यानंतर पांगरी पोलिसांनी तपास सुरू केला आणि अखेर रूपालीच्या कटाचा पर्दाफाश झाला.
दोन मुलं पोरकी; समाजात हळहळ
रूपाली आणि शंकर यांना दोन मुलं आहेत. या हत्याकांडामुळे त्यांचा आधारच हरवला आहे. एकीकडे पित्याचा मृत्यू झाला, तर आई तुरुंगात गेल्याने दोघंही मुलं पोरकी झाली. या घटनेमुळे संपूर्ण बार्शीत हळहळ व्यक्त केली जात आहे.