Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने भावकीतीलच 36 वर्षीय विवाहित महिलेवर शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर अमानुष हल्ला केला. धारदार कटरने सपासप वार करून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात महिलेच्या शरीरावर तब्बल 280 टाके घालावे लागले असून ती सध्या खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अत्यंत क्रूर हल्ला, 280 टाके आणि असह्य वेदना
पीडित महिलेवर इतक्या तीव्र स्वरूपाचे वार करण्यात आले की डॉक्टरांना तिच्या शरीरावर गोधडीप्रमाणे शिवण करावी लागली. एवढेच नव्हे, तर फक्त टाके घालण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यांवरच 22 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. शरीरावर कुठेही अशी जागा नाही जिथे जखम झालेली नाही. तिला प्रचंड वेदना होत असून, डोळ्यात पाणी आले तरी ते जखमांवर पडल्याने आग अधिक वाढते, असे तिने सांगितले.
नेमके काय घडले?
पीडित महिला शेतात काम करत असताना अभिषेक नवपुते (रा. घारदोन) याने तिला फोन केला. त्याने महिलेवर शरीरसंबंधाची जबरदस्ती मागणी केली आणि नकार मिळताच तिच्या जावेशी आपले जुळवून देण्याची मागणी केली. महिलेने फोन कट केला. संध्याकाळी ती काम संपवून पांदीच्या रस्त्याने घरी जात असताना अभिषेकने अचानक पाठून येत तिची वेणी ओढली, तिला जमिनीवर आपटले आणि कटरने तुटून पडला.
त्याने पहिला वार चेहऱ्यावर केला, त्यानंतर गळ्यावर वार करत सपासप शरीरभर कापले. सर्वात भयानक वार तिच्या पाठीवर होता, जो मानेपासून मांडीपर्यंत खोलवर होता. एवढ्या गंभीर जखमांमुळे ती जागच्या जागी रक्ताच्या थारोळ्यात पडली.
गावकऱ्यांचा संताप, आरोपी निर्दयपणे फिरत होता
या हल्ल्यानंतर संपूर्ण गावात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, आरोपी अभिषेक नवपुते निर्लज्जपणे गावात वावरत होता, जणू काहीच घडले नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. सध्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.
पीडितेच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती
पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तिच्या उपचारांसाठी मोठा खर्च असून, कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत. तिच्या दोन लहान मुलांचे भवितव्यही अंधारात गेले आहे. समाजातून या क्रूर हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.