Jalgaon : जळगाव तालुक्यातील मामुराबाद येथे शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. फैसल मुस्ताक पटेल (वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) आणि त्याचा मित्र वासीक खान युसुफ खान (वय २०) हे दोघे मामुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होते.
दररोजप्रमाणे ते शनिवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास दुचाकीने महाविद्यालयाकडे जात होते. मात्र, जळगाव-मामुराबाद मार्गावर मनोरा जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रकने (MH 13 AN 4445) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात फैसल पटेल याचा जागीच मृत्यू झाला, तर वासीक खान गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी वासीकला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. फैसल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
या घटनेची नोंद जळगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघातग्रस्त ट्रकच्या चालकावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.