Beed : बीडच्या आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचे निकटवर्तीय आणि भाजप पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याने शिरूर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खोक्या भाईने पैसा आणि दहशतीच्या जोरावर परिसरात वर्चस्व निर्माण केले असून, त्याच्या अत्याचारांच्या अनेक घटना आता बाहेर येऊ लागल्या आहेत.
हरिण आणि मोरांच्या शिकारीचा छंद
सतीश भोसले याला वन्यप्राण्यांच्या शिकारीचा मोठा छंद होता. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, त्याने आतापर्यंत *२०० हून अधिक हरिणांची शिकार केली आहे. तसेच डोंगरावर वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून *मोरेही पकडून खाल्ले आहेत.
शेतात हरणं पकडण्यास विरोध केला म्हणून अमानुष मारहाण
आठ दिवसांपूर्वी *सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यामुळे खोक्या भाईने **ढाकणे पिता-पुत्राला अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत *दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले, जबडा फ्रॅक्चर झाला आणि त्यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या शरीरावरही जखमांचे व्रण उमटले आहेत.
पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप
मारहाणीनंतर *१९ फेब्रुवारी रोजी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, *एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी इशारा दिला आहे की, खोक्या भाईचा “आका” सुरेश धस याच्यावर कारवाई न झाल्यास संपूर्ण शिरूर बंद करून आमरण उपोषण छेडले जाईल.
खोक्या भाईला अटक कधी?
या प्रकरणाशी संबंधित मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामुळे खोक्या भाईला अटक कधी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीड पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी दोन पथकं स्थापन केली असून, शिरूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अद्यापही त्याच्या अटकेबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
खोक्या भाईच्या अटकेबाबत बीड पोलिसांनी आश्वासन दिले असले तरी, प्रत्यक्ष कृती होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.