eknath Shinde : ‘…तर त्यावेळी शिवसेना फुटलीच नसती’, एकनाथ शिंदेंना केला मोठा गौप्यस्फोट
eknath Shinde : राज्यात शिवसेना दोन गटात विभागली गेल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या दाव्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा मोह झाला आणि पक्षात फूट पडली. जर ते मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेनेत फुट पडलीच नसती,” असा दावा शिंदे यांनी केला आहे.
“शिवसेना ही सहकाऱ्यांच्या जोरावर उभी राहिली, मालक-नोकराच्या संकल्पनेवर नाही”
“बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, पण उद्धव ठाकरे यांनी सहकाऱ्यांना नोकर समजायला सुरुवात केली. पक्ष वाढवण्यासाठी सहकार्याची भावना हवी, मालक-नोकराच्या नात्यावर पक्ष मोठा होत नाही,” असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
“दिल्लीतील बैठकीतील किस्सा आणि उद्धव ठाकरेंचा सवाल”
मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतील एका बैठकीत घडलेला किस्सा सांगताना शिंदे म्हणाले, “राज्यप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एका नेत्याला फोन आला, ‘कुठे जाताय?’ त्यावर उत्तर मिळाले, ‘दिल्ली.’ त्या नेत्याने विचारले, ‘मालकासोबत राहणार की नोकरासोबत जाणार?’ हा प्रश्न विचारणारे उद्धव ठाकरे होते.”
“मी खुर्चीसाठी लढलो नाही, तर माणसांसाठी लढलो”
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ म्हणाले, “मी कधीच पदासाठी मागणी केली नाही, ना तडजोड केली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी बंड पुकारले. हा निर्णय सहज नव्हता, पण शिवसेनेच्या भवितव्यासाठी आवश्यक होता. धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आमच्या पाठिशी होते,” असे ते म्हणाले.
“स्वाभिमानाला ठेच लागली की बंड उभे राहते”
शिंदे यांनी भगवद्गीतेचा संदर्भ देत सांगितले की, “18व्या अध्यायात म्हटलं आहे, बंड तेच करतात जे स्वाभिमानी असतात. चापलुसी करणारे लोक कधीच उठाव करत नाहीत. बंड करण्यासाठी धाडस लागतं, आणि वाघाचं काळीज लागतं. काही लोक फक्त वाघाचं कातडं पांघरतात, पण वाघ तर वाघच असतो,” असा अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
“शिवसेनेला वाचवण्यासाठी बंड केलं”
“बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, एकदा शब्द दिला की माघार घेत नव्हते. मी त्यांच्या विचारांचा कट्टर अनुयायी आहे. म्हणूनच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. नगरविकास खातं, आठ-नऊ मंत्रिपदं सोडली, पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. कारण उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, “माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेतील वाद आणखी वाढणार?
मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.