Rahul Gandhi : आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या.
मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका चुकीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. जयंतीनिमित्त अभिवादन करण्याऐवजी, त्यांनी चुकून श्रद्धांजली वाहिली. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सत्ताधारी पक्षाने या चुकीला हेरून त्यांच्यावर हल्लाबोल केला असून, माफी मागण्याची मागणी केली जात आहे.
सुषमा अंधारे यांचा भाजपवर पलटवार
या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवरच निशाणा साधला आहे. “शिवराय या आमच्या आराध्य असताना, भाजपने यापूर्वी महापुरुषांचा केलेला अपमान लक्षात घ्यायला हवा. राहुल गांधी यांच्या एका चुकीवर बोट ठेवणाऱ्यांनी आधी भगतसिंग कोश्यारी आणि राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यांवर काय कारवाई केली हे सांगावे,” असे त्यांनी म्हटले आहे.
कोश्यारी आणि सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानांची आठवण
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी “शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, मी नव्या युगाबद्दल बोलतोय,” असे विधान केले होते. तसेच, सावित्रीबाई फुले यांच्या लग्नावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचप्रमाणे, अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी “शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटण्यासाठी लाच दिली होती, पेटारे-बिटारे काहीच नव्हते,” असे विधान करून वाद ओढवून घेतला होता.
राजकीय संघर्ष तीव्र
सुषमा अंधारे यांनी या उदाहरणांचा उल्लेख करत भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दुसरीकडे सत्ताधारी पक्ष राहुल गांधींवर टीका करत असून, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
शिवजयंतीचा उत्साह साजरा होत असतानाच, या राजकीय वादामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.