BJP : …तर भाजपला केंद्रात शिंदेगटासह कोणत्याच मित्रपक्षांची गरज भासणार नाही; मोदी सरकारची मोठी कामगिरी

BJP : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, ताज्या इंडिया टुडे-सी व्होटर सर्वेक्षणानुसार, आज निवडणुका झाल्यास भाजपला एकहाती सत्ता मिळू शकते.
भाजपला मोठी वाढ, काँग्रेसची पीछेहाट
सर्वेक्षणानुसार, आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजप *२८१ जागांवर विजय मिळवू शकतो, तर काँग्रेस *७८ जागांवर थांबण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भाजपच्या ४१ जागा वाढण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसच्या २१ जागांची घट होऊ शकते. इतर पक्षांना १८४ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मतांची टक्केवारी काय सांगते?
- भाजप – ४०.७%
- काँग्रेस – २०.५%
- इतर पक्ष – ३८.५%
एनडीएला स्पष्ट बहुमताचा अंदाज
जर आज निवडणुका झाल्या, तर एनडीएला ३४३ जागा मिळू शकतात, तर इंडिया ब्लॉकला १८८ जागांवर समाधान मानावे लागू शकते. अन्य पक्षांना फक्त १२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वेक्षणाचा आधार
हा सर्वे २ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आला. ५४३ लोकसभा मतदारसंघांतील ५४,४१८ नागरिकांच्या मतांचा समावेश आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत ७०,७०५ जणांशी संवाद साधून मतं नोंदवण्यात आली. एकूण १ लाख २५ हजार १२३ लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.
गेल्या निवडणुकीत भाजपला मित्रपक्षांची गरज का भासली?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० जागांवर विजय मिळाला होता, मात्र बहुमतासाठी आवश्यक *२७२ जागा मिळवता आल्या नाहीत. तेलुगु देसम पक्ष (१६ जागा), संयुक्त जनता दल (१२ जागा) आणि शिवसेना (७ जागा) यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाले. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील फटक्यामुळे भाजपला पूर्ण बहुमतापर्यंत पोहोचता आले नव्हते.
२०२९ मध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार?
सध्याच्या सर्वेक्षणानुसार, भाजपने पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवला आहे, आणि जर हीच स्थिती कायम राहिली, तर २०२९ मध्येही भाजप पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याची शक्यता आहे.