sannyas : मुंबईतील चार तरुण-तरुणींनी ऐश्वर्यपूर्ण जीवनाचा त्याग करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. आर्यन जवेरी, वृष्टि बाउवा, ध्रुति नागदा आणि युति शाह या चारही तरुणांनी गुरुवारी जाहीरपणे संसारिक जीवनाचा त्याग करून जैन साधू आणि साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आहे.
या चौघांनी ७ फेब्रुवारीपासून साधूचा वेश धारण करणार आहेत. त्यांच्या दीक्षा समारंभासाठी घाटकोपर येथील १.२५ लाख चौरस फूट परिसरात एक विशेष महाल बांधण्यात आला होता, जिथे हा कार्यक्रम संपन्न झाला. हे चारही तरुण मोठ्या उद्योगपती घराण्यातील असून, त्यांनी आपल्या भौतिक सुखांवर मात करून आध्यात्मिक जीवनाचा मार्ग निवडला आहे.
आर्यन जवेरी हे शेकडो कोटींच्या संपत्तीचे वारसदार असून, त्याचे वडील जुबिन जवेरी हे एक प्रसिद्ध औषध कंपनीचे मालक आहेत. आर्यनला लहानपणापासूनच संन्यस्त जीवन जगण्याची इच्छा होती. त्याच्या वडिलांनी त्याला भौतिक सुखांच्या माध्यमातून मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी झाले नाहीत. आर्यनच्या मते, आध्यात्मिक प्रगती हीच खरी संपत्ती आहे.
वृष्टि बाउवा, ध्रुति नागदा आणि युति शाह यांनीही आपल्या आवडी आणि ऐश्वर्यपूर्ण जीवनाचा त्याग केला आहे. वृष्टिला बाईकिंगची आवड होती, तर ध्रुतीला संगीत आणि युतीला चित्रपट पाहण्याची आवड होती. तथापि, त्यांनी या सर्व सांसारिक सुखांना मुकाट्याने निरोप दिला आहे.
दीक्षा समारंभाच्या दिवशी, या तरुणांनी पाच तासांच्या मिरवणुकीनंतर जाहीरपणे पैसे, दागिने आणि इतर भौतिक वस्तू वाटून टाकल्या. या कार्यक्रमाचे संयोजक केतन मेहता यांनी सांगितले की, या तरुणांनी आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी भौतिक सुखांचा त्याग केला आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून, हा त्याग नवीन जीवनाची सुरुवात आहे.
या चारही तरुणांचा निर्णय समाजात चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी धन, ऐश्वर्य आणि सांसारिक सुखांचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाचा मार्ग स्वीकारल्याने, त्यांच्या दृढनिश्चयाचे आणि आध्यात्मिक आकांक्षेचे दर्शन घडते.