Gaurav Ahuja : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून वाद निर्माण करणारा गौरव अहुजा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी सकाळपासूनच त्याचा शोध सुरू केला होता, आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. पुण्यातून बाहेर पळालेल्या गौरव अहुजाला पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले असून, लवकरच त्याला पुण्यात आणण्यात येणार आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
गौरव अहुजाचा माफीचा व्हिडीओ समोर
गौरव अहुजाने आपल्या कृत्याबद्दल माफी मागतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो म्हणतो,
“मी गौरव अहुजा, राहणार पुणे. माझ्याकडून काल पब्लिकमध्ये जे कृत्य झालं, ते अत्यंत चुकीचं होतं. मी संपूर्ण जनता, पोलीस आणि शिंदे साहेबांची मनापासून माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी.”
अश्लील कृत्यामुळे राज्यभर संतापाची लाट
गौरव अहुजाच्या वर्तनामुळे पुण्यासह संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, हा पहिलाच प्रसंग नाही. याआधीही गौरव अहुजा गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
गौरव अहुजाची गुन्हेगारी पार्श्वभूमी
गौरव अहुजावर याआधीही जुगार आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तो पुण्यातील नामांकित गुंड सचिन पोटे याच्यासोबत काम करतो. 2021 मध्ये गौरव अहुजा, सचिन पोटे, सुनील मखेजा आणि अजय शिंदे यांना पोलिसांनी अटक केली होती.
क्रिकेट बेटिंग रॅकेटचा सहभाग
गौरव अहुजा आणि त्याच्या साथीदारांनी क्रिकेट बेटिंगच्या माध्यमातून अनेक तरुणांना आर्थिक संकटात टाकले होते. तरुणांना मोठ्या रकमेच्या सट्ट्यात अडकवून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा केला जात असे. पैसे परत करण्यासाठी या तरुणांना चोरी करण्यास भाग पाडले जात होते. अखेर एका कॉलेजमधील विद्यार्थ्याने धाडसाने पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांची कठोर कारवाई अपेक्षित
गौरव अहुजा याने केलेल्या अश्लील वर्तनामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. तसेच, त्याच्या मागील गुन्हेगारी इतिहासामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, आता पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू होईल.