Omraje Nimbalkar : धाराशिवमधील राजकीय हालचालींनी सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापवलं आहे. ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या संभाव्य फुटीर खासदारांमध्ये मुंबईतील एक आणि ग्रामीण भागातील पाच खासदारांचा समावेश असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबतही महत्त्वाचे संकेत मिळत आहेत.
धाराशिवमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परिवहन आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचक वक्तव्य करत ओमराजे निंबाळकर महायुतीत जाण्याचे संकेत दिले. या बैठकीदरम्यान सरनाईक यांनी ओमराजे यांच्याकडे निर्देश करत, “ते महायुतीचेच आहेत,” असं वक्तव्य केलं, ज्यावर ओमराजे यांनी हास्याने प्रतिसाद दिला. या प्रतिक्रिया पाहता त्यांनी अप्रत्यक्षपणे सरनाईकांच्या वक्तव्याला मूक संमती दिल्याचं मानलं जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ओमराजे शिंदे गटात जाणार का, या चर्चांना उधाण आलं आहे. यावर ओमराजेंनी मात्र अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
या चर्चांमध्ये भर घालत प्रताप सरनाईक यांनी “धाराशिवमध्ये लवकरच राजकीय भूकंप होईल,” असं विधान केलं आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटासाठी ही मोठी कोंडी ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धाराशिवमधील राजकीय घडामोडींवर सध्या साऱ्यांचं लक्ष केंद्रित आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा फटका बसेल, असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.