Rohit Sharma : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतरही रोहित शर्मा धोनीला नाही विसरला, सेलिब्रेशननंतर केले असे काही की..

Rohit Sharma : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आणि संपूर्ण संघाने जल्लोष केला. मात्र, या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत असतानाही रोहित शर्मा आपला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विसरला नाही. धोनीप्रमाणेच रोहितनेही संघातील मॅचविनर खेळाडूला विशेष महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले.

धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत रोहितचा अनोखा सन्मान

2002 मध्ये भारताने पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा ही ट्रॉफी जिंकली होती. धोनी नेहमी युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्यावर विश्वास दाखवत असे. विजयाचा आनंद साजरा करताना तो ट्रॉफी थेट मॅचविनरच्या हाती सुपूर्द करत असे. रोहित शर्मानेही यावेळी धोनीच्या या परंपरेला सन्मान देत मॅचविनर कुलदीप यादवला ट्रॉफी उचलण्याचा सन्मान दिला.

कुलदीप यादवला ट्रॉफी सुपूर्द करत दिली मॅचविनरची कबुली

रोहित शर्माने आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारली. त्यानंतर संपूर्ण भारतीय संघासोबत तो मैदानात जल्लोष साजरा करत होता. सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्याने रोहितच्या हातून ट्रॉफी घेत जल्लोष सुरू केला. मात्र, त्यानंतर रोहितने संधी साधत कुलदीप यादवला ट्रॉफी उचलण्यासाठी पुढे केले.

कुलदीपच्या खेळीशिवाय विजय कठीण

या फायनल सामन्यात कुलदीप यादवने निर्णायक क्षणी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या मजबूत फलंदाज राचिन रवींद्र आणि केन विल्यम्सनला माघारी पाठवले. या दोन महत्त्वाच्या विकेट्समुळे भारताचा विजय निश्चित झाला. त्यामुळे कुलदीपच्या योगदानाची दखल घेत रोहितने त्याला ट्रॉफी हातात घेण्याची संधी दिली.

रोहित शर्माने जिंकली चाहत्यांची मने

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कर्णधार म्हणून रोहितने संपूर्ण संघाला समान न्याय दिला आणि मॅचविनरला योग्य तो सन्मान दिला. त्याच्या या कृतीने तो केवळ एक उत्कृष्ट खेळाडू नाही, तर संघाचा खरा नेता असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.