Rohit Sharma : भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयानंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार का, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याआधी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही रोहित निवृत्ती जाहीर करेल का, याची चर्चा रंगली होती. मात्र, पत्रकार परिषदेत रोहितने स्पष्ट शब्दांत या चर्चांना पूर्णविराम दिला.
“मी वनडेतून निवृत्त होणार नाही” – रोहित शर्मा
विजयानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने आपल्या खेळावर आणि संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. पत्रकार परिषदेच्या शेवटी त्याला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, “अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, मी वनडेतून निवृत्त होणार नाही. या अफवांना हवा देऊ नका.”
विजयाचा शिल्पकार ठरलेला रोहित शर्मा
फायनल सामन्यात रोहित शर्माने 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला. आपल्या फलंदाजीबाबत तो म्हणाला, “मी कोणताही नवा प्रयोग केला नाही. मागील काही सामन्यांमध्ये जसे खेळत आलो आहे, तसेच खेळलो. पॉवरप्लेमध्ये जलद धावा करणे महत्त्वाचे असते, कारण नंतर धावा काढणे कठीण होते. त्यामुळे सुरुवातीलाच आक्रमक खेळणे गरजेचे आहे.”
केएल राहुलच्या खेळीचं कौतुक
रोहितने केएल राहुलच्या योगदानावरही प्रकाश टाकला. “मी राहुलला फलंदाजी करताना पाहिले आहे. तो खूप संयमी खेळाडू आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी दिली. उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या कामगिरीबाबत मी खूप आनंदी आहे.”
भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऐतिहासिक कामगिरी
या विजयासह भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली. तसेच, भारताने एकूण तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशामुळे भारतीय संघाने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे.
भारताचा हा विजय संपूर्ण क्रिकेट विश्वात गाजत असून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आणखी मोठी कामगिरी करण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे