Sharad Pawar : मी नावालाच तुतारीवाला…; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या बॅनरवरुन शरद पवार गायब; शिंदे, दिघेंना मानाचे स्थान
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आता शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवरही लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मोहोळच्या आमदाराच्या बॅनरवरून तुतारी गायब!
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शहरात बॅनर लावले. मात्र, या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा पक्षाची ओळख असलेली ‘तुतारी’ नव्हती. त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचे फोटो झळकत होते.
पक्षांतराची चर्चा जोरात
या बॅनरमुळे राजू खरे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. खरेंनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट करताना, “मी फक्त नावाला तुतारीवाल्या पक्षात आहे, पण खरा शिवसैनिक आहे” असे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता वाढली आहे.
बैठकीत व्यक्त केलेली नाराजी
काही दिवसांपूर्वी झालेल्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही खरे यांनी आपल्या नाराजीचा सूर लावला होता. “मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली. मी ३५ वर्षे तुमच्यासोबत होतो” असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना पत्रकार उपस्थित असल्याची आठवण करून दिली. मात्र, खरे यांनी “समोर पत्रकार असले तरी फरक पडत नाही” असे स्पष्ट केले.
शिंदे गटाचा राष्ट्रवादीवर निशाणा?
याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शरद पवारांच्या पक्षातील आमदारही शिंदेंच्या वाटेवर आहेत का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील काही दिवसांत राजू खरे कोणता निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.