ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad : बाप मृत्यूपंथाला, पोटच्या ३ पोरींनी मृत्यूपत्रावर चोरुन घेतले अंगठ्याचे ठसे, पुण्यातील भयानक प्रकार

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित रुग्णालयात ब्रेन डेड वडिलांच्या अंगठ्याचे ठसे बनावट मृत्युपत्रावर घेऊन त्यांच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्याचा प्रकार तिन्ही मुलींनी केल्याचे समोर आले आहे.

वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळवण्याचा डाव

पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला कर्करोग व हृदयरोगाने ग्रासले होते. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून, सर्वांचे विवाह झाले आहेत. वडील मुलासोबत राहत होते. १४ जानेवारी रोजी तब्येत गंभीर झाल्याने त्यांना पिंपरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत गेल्याने ते ब्रेन डेड झाले.

दरम्यान, पिंपळे गुरव येथे त्यांच्या नावावर तीन मजली इमारत आहे. वडील गेल्यानंतर मुलगा मालमत्तेत वाटा देणार नाही, या भीतीने मुलींनी हा कट रचला. विशेष म्हणजे वडील आजारी असताना एकदाही न भेटणाऱ्या या मुली अचानक रुग्णालयात वारंवार येऊ लागल्या.

रुग्णालयात बनावट मृत्युपत्रावर अंगठ्याचे ठसे

१९ फेब्रुवारी रोजी मुलगा रुग्णालयाच्या बाहेर गेला असताना तिन्ही मुली वडिलांच्या बेडजवळ पोहोचल्या. त्यांनी आधीच तयार केलेले बनावट मृत्युपत्र समोर ठेवले आणि वडिलांच्या हाताचे ठसे घेतले. एवढेच नाही, तर त्यांच्या हातात पेन देऊन सही घेण्याचाही प्रयत्न केला.

रुग्णालय प्रशासनाने उघड केला प्रकार

हा प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आला आणि त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. मुलींना थांबवत त्यांनी पोलिस आणि मुलाला माहिती दिली. यानंतर मुलाने संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कधीही मालमत्तेवर वाद नव्हता, तरीही विश्वासघात?

विशेष म्हणजे, सर्व भावंडांची आर्थिक परिस्थिती चांगली असून, कधीही संपत्तीच्या वाटणीवरून वाद झाला नव्हता. फक्त किरकोळ वाद होत असत, मात्र मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रश्न कधीच उपस्थित झाला नव्हता.

मुलाचा सवाल – असं का केलं?

“आम्ही चार भाऊ-बहिणी आहोत. बहिणी पूर्वी घरी येत-जात होत्या, पण वडील आजारी पडल्यापासून त्यांनी रुग्णालयात येण्याचेही टाळले. मात्र, जेव्हा डॉक्टरांनी त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले, तेव्हा त्या दोन-तीन दिवस येऊ लागल्या. पण त्यांनी असा प्रकार केल्याचे कळल्यावर आम्हाला धक्का बसला.” – रुग्णाचा मुलगा

पोलिस तपास सुरू

या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button