Uday Samanta : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे. दावोस दौऱ्यावर असलेल्या सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटातील चार आमदार आणि तीन खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. तसेच काँग्रेसच्या पाच आमदारांनीही शिंदेंशी भेट घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दावोस दौऱ्यातून मोठ्या घोषणांचा इशारा
उदय सामंत सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी जाहीर केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दावोसच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींच्या गुंतवणुकीची नोंद झाली आहे. पुढील तीन महिन्यांत राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा करत सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटातील अधिक नेत्यांच्या शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली आहे.
काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या फाटाफुटीचा अंदाज
सामंत यांनी म्हटले की, पुढील तीन महिन्यांत शिवसेना ठाकरे गटाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख, तसेच काँग्रेसचे माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहेत. UBT आणि काँग्रेस गटांत फूट पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याचा दावा केला आहे.
या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आले असून पुढील काळात काय घडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.