Valmik Karad : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात एक महत्त्वाची बाब उघड झाली आहे. त्यानुसार, वाल्मिक कराड याच्याकडे असलेल्या अफाट संपत्तीचा व त्याच्या श्रीमंतीचा सविस्तर तपशील पोलिसांनी उघड केला आहे. या नव्या माहितीनुसार, वाल्मिक कराड याची मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार अधिक तपासले जात असून, त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराडकडे असलेल्या मालमत्तेचा तपशील पाहता, त्याने राज्यभर विविध ठिकाणी प्रचंड संपत्ती जमा केली आहे. विशेषतः पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि एफसी रोड या हायप्रोफाइल भागांमध्ये त्याची अंदाजे 115 कोटींची मालमत्ता आहे. तसेच, त्याच्याकडे महागड्या गाड्यांचाही मोठा संग्रह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने त्याच्याकडील तीन महागडे आयफोनमधील डेटा डिलिट केला होता. मात्र, एसआयटी पथकाने तांत्रिक मदतीने हा डेटा पुन्हा मिळवला आणि महत्त्वाची माहिती उघडकीस आली. तपासादरम्यान, वाल्मिक कराड हा लक्झरी सीरीजमधील गोल्डन आयफोन 16 प्रो वापरत असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, त्याच्याकडे आयफोन 13 प्रोचे दोन वेगवेगळ्या रंगांचे मॉडेल्सही होती. या तिन्ही फोनची किंमत दीड ते तीन लाख रुपयांच्या घरात आहे.
वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्यांची यादी:
- फोर्ड इंडेव्हर – MH-44/T-0700
- अशोक लेलँड हायवा – MH-44/U-0700
- जॅग्वार लँड रोव्हर – MH-44/AC-0700
- जेसीबी – MH-44/S-7450
- मर्सिडीज बेंझ – MH-44/Z-0007
- बीएमडब्ल्यू – MH-44/AC-1717
- अशोक लेलँड हायवा – MH-44/U-1600
याशिवाय, सुदर्शन घुलेकडे याच्याकडे देखील टोयोटो इनोवा आणि दोन महिंद्रा ट्रॅक्टर्स असल्याचे समोर आले आहे.
वाल्मिक कराडच्या संपत्तीचा तपास सुरू असून, पोलिस अधिक तपशील उघड करण्याच्या तयारीत आहेत. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळू शकते.