Prema Sakhardande : मुंबई: मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे गुरुवारी रात्री १० वाजता, वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या माहीम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे कन्या असून, दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कला आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान
गेल्या अनेक दशकांपासून नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रेमा साखरदांडे या शिक्षिका, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही परिचित होत्या. ‘शालेय रंगभूमी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते.
त्यांचे वडील वसंतराव कामेरकर हे ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या ध्वनिमुद्रिका कंपनीत ध्वनिमुद्रक होते. तर शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले असून, मुंबईच्या शारदा सदनमधून त्या मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या होत्या.
संपूर्ण कुटुंबच अभिनय क्षेत्रात
प्रेमा साखरदांडे या १० भावंडांपैकी एक होत्या. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते यांनीही अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे भाऊ बापू, अशोक, विश्वनाथ आणि मुकुंद यांनीही नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केले. त्यांच्या भगिनी कुमुद ह्या गायिका असून, त्यांनी ऑस्ट्रेलियात संगीत कार्यक्रम केले होते.
‘चले जाव’ चळवळीत सहभाग
प्रेमा साखरदांडे ‘चले जाव’ चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या होत्या. तसेच ‘आविष्कार’ आणि ‘चंद्रशाळा’ या संस्थांच्या संस्थापकांपैकी एक होत्या. त्यांनी अनेक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
अमिट अभिनयाचा ठसा
प्रेमा साखरदांडे यांनी दूरचित्रवाणीवरही आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. ‘प्रपंच’ या लोकप्रिय मालिकेतील आजीच्या भूमिकेमुळे त्या विशेष ओळखल्या गेल्या.
चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या भूमिका
त्यांनी ‘फ्युनरल’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. हा चित्रपट अंतिम संस्कार व्यवस्थापनावर आधारित होता. तसेच, त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्येही अभिनय केला होता. ‘स्पेशल २६’ आणि ‘इम्पॉसिबल मर्डर’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या.
एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
शिक्षण, अभिनय, लेखन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या प्रेमा साखरदांडे यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.