Eknath Shinde : आपचा ‘तो’ नेता पुढचा एकनाथ शिंदे! दिल्लीतील निकालानंतर सनसनाटी खबर; राजकारणात खळबळ

Eknath Shinde : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला 70 पैकी केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपने 27 वर्षांनंतर सत्ता काबीज करत 48 जागांवर विजय मिळवला. या पराभवामुळे केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, मुख्यमंत्री आतिशी यांनी आपला मतदारसंघ निसटत्या फरकाने जिंकत स्थान कायम राखले.
दिल्लीतील या धक्कादायक पराभवानंतर, पंजाब काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गावर जाऊ शकतात, असे बाजवा यांनी म्हटले आहे.
“आपचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात” – बाजवा यांचा दावा
बाजवा यांच्या मते, पंजाबमधील आपचे 30 हून अधिक आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत आणि ते कोणत्याही क्षणी पक्षांतर करू शकतात. “मी पंजाब काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असताना पक्षाच्या 22 नेत्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला. मात्र, आता त्यांना समजले आहे की पुढील निवडणुकीत आपची सत्ता टिकणार नाही,” असा दावा बाजवा यांनी केला.
तसेच, पंजाबमधील आम आदमी पक्ष आणि दिल्लीतील पक्ष नेतृत्वामध्ये अनेक विषयांवर मतभेद असल्याचेही त्यांनी सांगितले. “भगवंत मान गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात जे घडले, तेच पंजाबमध्ये होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये ‘एकनाथ शिंदे’ होणारे पहिले नेते भगवंत मान असतील,” असे बाजवा म्हणाले.
केजरीवालांची पंजाबमध्ये एंट्री?
पंजाब आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमन अरोरा यांच्या अलीकडील विधानांमुळे पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. “पंजाबमध्ये मुख्यमंत्री शीखच असला पाहिजे, असे काही गरजेचे नाही,” असे अरोरा यांनी म्हटले होते. यावर बाजवा यांनी प्रतिक्रिया देताना, “केजरीवाल पंजाबमध्ये स्वतःला पुढे आणण्याच्या तयारीत आहेत. त्यांना आधीपासूनच दिल्लीतील पराभवाची कल्पना होती,” असा दावा केला.
दिल्लीतील निवडणुकीनंतर पंजाबमध्ये ‘आप’मध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगवंत मान यांच्या संभाव्य भूमिकेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.