‘मी तुमच्यासोबत झोपले तर…’; श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, चित्रपट क्षेत्रात खळबळ

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखले जाते. अनेक ठिकाणी तिने काम केलं असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.

तसेच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. नुकतीच तिने आरपार युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अनुभव सांगितले आहेत. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मराठी इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत तिने मोठे वक्तव्य केले आहे.

अनेक वर्षांपूर्वी मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. तेव्हा या क्षेत्रात काम करून मला बरीच वर्षे झाली होती. मी नवखी नव्हते. आपल्या इंडस्ट्रीत बऱ्याच जणांचा अभिनेत्री कायम उपलब्ध असतात असा गैरसमज आहे. मात्र तसे काही नसते.

एकदा एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी तुझं मानधन काय आहे? असं विचारलं. मी त्यांना ते देखील सांगितल. तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास, तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते देईन.

दोन ते तीन मिनिटांसाठी मी ब्लँक झाले होते. अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं. तेव्हा मला घाम फुटला कारण, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. मी खूपच हादरले होते. मला काय बोलू समजत नव्हतं.

थोडा विचार करून मला जाणवलं या माणसाला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी त्याला म्हटलं, अच्छा म्हणजे मी तुमच्याबरोबर झोपले, तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? तेव्हा तो माणूस म्हणाला हे काय बोलतेस तू? मी म्हणाले, माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? यापुढे बोलताना थोडा अभ्यास करा.