मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला 48 तासांहून अधिकचा कालावधी उलटूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे. सैफ सध्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना, पोलिस विविध लोकांची चौकशी करत आहेत. त्यातच सैफची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर हिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
करीनाच्या जबाबातून एक वेगळीच बाब समोर आली आहे. याआधी पोलिसांनी हल्लेखोराने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसल्याचं म्हटलं होतं, मात्र करीनाच्या जबाबाने हे चित्र वेगळं सूचित करत आहे.
करिना कपूरचा जबाब: मुलांच्या खोलीकडे धाव घेतली
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांची चौकशी केली आहे. यात घरातील कर्मचाऱ्यांपासून ते सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकापर्यंत अनेकांचा समावेश आहे. करीना कपूरने आपल्या जबाबात सांगितलं की, चोर घरात शिरल्याचे कळताच नर्सने आरडाओरड केली. त्यावेळी सैफ आणि करीनाने मुलांच्या खोलीकडे धाव घेतली. करीनाच्या मते, हल्लेखोर मुलगा जहांगीरवर हल्ला करण्यासाठी त्याच्या खोलीत शिरला असावा.
चोरीचा उद्देश नव्हता?
करिनाने आपल्या जबाबात सांगितलं की, चोर घरात शिरल्यानंतर त्याने कोणत्याही मौल्यवान वस्तूंची चोरी केली नाही. घरात असलेल्या दागिन्यांना त्याने हात लावला नाही. उलट, आरोपीने नर्स लिमाकडे चाकूचा धाक दाखवून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पोलिसांच्या तपासानुसार, करीनाचा जबाब काहीतरी वेगळं सूचित करत असून, चोरीचा उद्देश नसल्याचं स्पष्ट होत आहे.
मदतीसाठी आरडाओरड
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर घरातील नर्स आणि करीनाने मदतीसाठी जोरात आरडाओरड केली. या घटनेमुळे करीना मानसिक तणावात असून, घटनेनंतर तिची बहीण करिष्माने तिला तिच्या घरी नेलं. हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात नेण्यासाठी कार उपलब्ध नसल्यामुळे रिक्षाने त्याला 2 ते अडीच किलोमीटर दूर असलेल्या लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं.
बॉलिवूड सेलिब्रिटींची भेट
घटनेनंतर करीनाची अनेक कलाकारांनी भेट घेतली आहे. करिष्माच्या घरी अभिनेता संजय दत्त आणि इतर निकटवर्तीय भेटीसाठी गेले. दुसरीकडे, सैफची मुलगी सारा अली खान आणि रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी लिलावती रुग्णालयात जाऊन सैफची भेट घेतली.
अनेकांची चौकशी, पण अटक नाही
वांद्रे पोलिसांनी सैफच्या घरात सुतारकाम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली आहे. तसेच, फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालकाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
पती सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरने मुंबई पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. ती म्हणाली की जेव्हा हे सर्व रात्री घडले तेव्हा सैफ अली खान एकटाच हल्लेखोराचा सामना करत राहिला. त्याने घरातील सर्व महिलांना इमारतीच्या १२ व्या मजल्यावर जाण्यास सांगितले.
जेव्हा मी १२ व्या मजल्यावरून ११ व्या मजल्यावर आले तेव्हा मला दिसले की आरोपी अजूनही रागावलेला होता आणि तो सैफवर सतत हल्ला करत होता. तेव्हा मी खूप घाबरले होते. आरोपीने घरात ठेवलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंना आणि दागिन्यांना हातही लावला नाही.