कामाच्या शोधत आलेल्या मजुरांवर काळाची झडप, रात्री झोपले अन् सकाळी उठलेच नाहीत, कारण…

बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक दुःखद घटना घडली आहे. याठिकाणी रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलडाणा येथे गेलेल्या आदिवासी मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे.

या घटनेत 4 जण ठार, तर 6 मजूर जखमी झालेत. हे 10 मजूर रोजगाराच्या शोधात नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर लागले होते. ते महामार्गालगतच्या वडनेर भोजली गावालगत एका झोपडीत झोपले होते. यावेळी ही घटना घडली आहे.

हे मजूर गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी आले होते. पहाटे साडे 5 च्या सुमारास हे सर्वजण साखरझोपेत असताना ट्रकने त्यांना चिरडले. यामुळे एकच खळबळ उडाली.

हे मजूर रस्त्याच्या बाजूला टिन शेड बनवून त्यात झोपले होते. खामगावकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने त्यांच्या शेडला धडक दिली. यावेळी क्षणार्धातच होत्याचे नव्हते झाले. अंगावरून गाडी गेल्यामुळे शेडमध्ये झोपलेल्या 4 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण जखमी झाले.

मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, कामाच्या शोधात गेलेल्या मजुरांना आज सकाळी ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना समजली. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्णालयात शिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पीडितांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. आमचे पथक याठिकाणी लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जखमींवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.