सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता हे खासदार शिंदे यांच्याकडे तक्रार करत आहेत.
काहीही करा, पण तिकीट ‘फिक्स’ करा’ असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे.
शिंदे यांचे खासदार त्यांची भेट घेणार असून धनुष्यबाण शक्य नसेल, तर कमळ चिन्हावर लढण्याचीही आपली तयारी आहे. पण तिकीट द्या, असा आग्रह ते धरणार आहेत. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली. मात्र आता सगळंच अवघड झालं आहे.
यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व १३ विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे, यासाठी धडपड करत आहेत. मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे. यामुळे गुंता वाढला आहे.
शिवसेनेच्या १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे. त्यामुळे भाजप ३० जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते. शिवसेना यंदाही २२ जागांसाठी अडून बसली होती, शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या, अशी मागणी शिंदेंनी केली आहे.
परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यांना 8 जागा आणि अजित पवार यांना 4 जागा देण्यात येणार असल्याची माहिती सध्या आहे. यामुळे वातावरण तापलं आहे.