Mohammed Shami : जखमी मॅक्सवेल लढताना सगळ्यांना दिसला, पण शमी ‘ही’ दुखापत लपवून सलग ७ सामन्यात देशासाठी लढला ते कुणाला नाही दिसलं

Mohammed Shami : भारताने नुकत्याच खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये मोहम्मद शमीची इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा सर्वाधिक चर्चा झाली. शमीच्या तोफगोळ्यांनी विरोधी संघाची दाणादाण झाली. शमी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल लढताना पाहून अवघ्या जगानं सलाम ठोकला. मात्र, शमीने घोट्याच्या दुखण्याने त्रस्त असतानाही वर्ल्डकप खेळला होता. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे.

दुखापत लपवून खेळल्याने शमीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार शमीला वर्ल्डकपमध्ये घोट्याच्या दुखण्याने त्रस्त केले होते. स्पर्धेनंतर शमीने विश्रांती घेतली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली नाही.

यानंतर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात, बीसीसीआयने तिन्ही फॉरमॅटसाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये शमीला टी-20 आणि एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली. तो कसोटी संघाचा भाग असेल.

मात्र, संघाची घोषणा करताना बोर्डाने शमीवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, अशी माहिती दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सामने 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेद्वारे सुरू होतील.

यानंतर 17 डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर अखेर 26 डिसेंबरपासून दोघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, शमीने केवळ 7 सामन्यात 24 बळी घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली, ज्यामध्ये दोनवेळा पाच बळी आणि एक सात बळींचा समावेश होता. म्हणजे 7 पैकी तीन सामन्यात त्याने 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या.

या स्पर्धेत शमी एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. उल्लेखनीय आहे की, विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीने केवळ बेंचवर वार्मिंग केले होते.

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती, त्यानंतर शमी उर्वरित सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला. यानंतर त्याने आपल्या कामगिरीने इतिहास लिहिला.