जगात कोणीही सांगू शकत नाही की शरद पवार…!! अजितदादांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी २०१९ च्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य केले. यामुळे याचा राजकीय परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी एका मुलाखतीत भाजपला पाठिंबा देण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, तुम्हाला माहिती नाही. जे काही झाले होते ते सर्वांना माहिती आहे. या घटनेला ५ वर्ष झाली. काय घडले होते, कोणासोबत आणि कुठे बैठक झाली आणि त्यात कोण उपस्थित होते.

त्या बैठकीसाठी शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत:होतो, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. आमचे नेते शरद पवार होते. ते जे म्हणतील त्यानुसार आम्ही गोष्टी केल्या. मात्र नंतर वेगळं चित्र निर्माण केले गेले.

दरम्यान, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार टीकले नाही कारण पवारांनी पाठिंबा दिला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले.

नंतर काही दिवसांनी अजित पवारांसह काही आमदार भाजपसोबत गेले. तेव्हा शरद पवार का आले नाहीत तुमच्या सोबत या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, शरद पवार हे असे नेते आहेत की त्यांच्या मनात काय चालले आहे हे जगातील एकही व्यक्ती ओळखू शकत नाही.

मी देखील नाही. माझ्या काकू देखील नाही, आमची सुप्रिया देखील नाही. असे अजित पवारांनी सांगितले. तसेच जेव्हा २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते, असेही ते म्हणाले.