मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. भाजपशी महायुतीची चर्चा करत असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी तसे काही चित्र बघायला मिळत नाही.
असे असताना विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना युतीत सहभागी केले जाऊ शकते, अशी देखील माहिती समोर आली आहे. सध्या लोकसभेच्या जागांबाबत नाराजी नाट्य होईल, म्हणून हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, त्या बदल्यात ते लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थात राज ठाकरे महायुतीचे स्टार कॅम्पेनर असतील, असेही सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता राज ठाकरे काय निर्णय घेणार हे लवकरच समोर येईल.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राज ठाकरेंसोबत दिल्लीत बैठक झाली. योग्य वेळ येण्याच्या आधीच बोलण्यापेक्षा तुम्ही सर्वांनी एक-दोन दिवस वाट पाहावी, असेही ते म्हणाले.
यावर नंतर आपण त्यावर सविस्तर बोलूया, हेच बरे. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवार जाहीर झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला भेट देत आहेत, याबाबत लवकरच तुम्हाला माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले. मनसे महायुतीत घेण्यास काहींचा विरोध असल्याचे देखील पुढे आले आहे.
दरम्यान, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दक्षिण मुंबईतून दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आणि मराठी मतांचे विभाजन केले होते. त्यामुळे राज ठाकरे मुंबई दक्षिण आणि कल्याण या दोन जागांसाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिर्डी आणि नाशिकची जागा देखील ते मागू शकतात.