Ravindra Berde : हरहुन्नरी कलाकार गेला!! अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा…

Ravindra Berde : चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले आहे. यामुळे एक हरहुन्नरी कलाकार आता आपल्यातून गेला आहे. त्यांनी आपल्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.

रवींद्र बेर्डे यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईत टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यातच त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. अनेक विनोदी भूमिका त्यांनी केल्या.

रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ होते. रवींद्र बेर्डे यांच्यावर उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना बरे वाटू लागल्याने घरी सोडण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नभोवाणीसह नाट्यसृष्टीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.

त्यांनी चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊदे, हमाल दे धमा, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेल्या या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. अनेक भूमिका त्यांच्या प्रेक्षकांना भावल्या.

त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटसृष्टीत ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि ५ हिंदी चित्रपटांतही झळकले. १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र पुन्हा ते कामाला लागले होते.