Sharad Mohol : शरद मोहोळला संपवण्यासाठी शुक्रवारच का निवडला? मामाच्या बदलासाठी भाच्याने ‘असा’ रचला कट

Sharad Mohol: पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी ( 5 जानेवारी) दुपारी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी आरोपींना अटक केली. यापैकी दोन वकिलही आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मोहोळची हत्या मामाचा बदला घेण्यासाठी भाच्याने केली आहे. आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर याचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांदले यांचाही या हत्येत सहभाग आहे.

शरद मोहोळ आणि कानगुडे यांच्यात दहा वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्या वेळी कानगुडे सुतारदरा येथेच राहत होता. मात्र, मोहोळसोबत वाद झाल्यानंतर त्याच्यावर सुतारदरा सोडण्याची वेळ आली. नंतर तो भूगावला स्थायिक झाला. गांदले याच्यासोबतही मोहोळचा वाद होता. मामांच्या या वादातूनच मोहोळचा खून केल्याचे मुन्ना याने चौकशीत कबूल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोहोळची हत्या करण्याचा ‘गेम प्लान’ आधिच केला होता. यासाठी त्यांनी तीन महिन्यांपूर्वी पिस्तूल खरेदी केले होते. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर एक ते दीड महिन्यापासून मोहोळ टोळीत कार्यरत होता. आरोपींनी मोहोळसोबत विश्वास निर्माण करण्यासाठी त्याच्यासोबत जेवण केले, फिरायला गेले. त्यानंतर शुक्रवारी मोहोळला संपवण्याची संधी मिळाली.

त्या दिवशी मोहोळचे दोन साथीदार त्याच्यासोबत होते. आरोपींनी मोहोळला त्याच्या घराच्या जवळून नेले आणि गोळ्या झाडल्या. गोळी लागून मोहोळ जागीच ठार झाला. शरद मोहोळच्या खुनानंतर पोलिसांनी कोथरूड पोलिसांसह गुन्हे शाखेची नऊ पथके आरोपींचा शोध घेत होती. पोलिसांनी आरोपींची वाहने आणि मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोळेकरची कार दाखल झाल्याची माहिती मिळाली. आरोपी सातारा महामार्गाने जात असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी खेड-शिवापूर टोल नाका ओलांडून पुढे आले असता, किकवी गावाच्या जवळ संशयित कार आणि तेथे जवळच काही लोकांचा घोळका असल्याचे दिसले. पोलिसांनी खात्री करून तेथे घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांना समोर पाहूनही एकाही आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तूल, काडतुसे आणि वाहने जप्त केली आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.