माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या रमाकांत आचरेकर सरांच्या एका कार्यक्रमात कांबळी दिसला, तेव्हा त्याची अवस्था पाहून उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. सचिन तेंडुलकरसारखा मित्र असूनही कांबळीला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत, असे चाहते म्हणत आहेत.
कपिल देव यांसारख्या दिग्गजांनीही कांबळीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, याबाबत कांबळी आणि तेंडुलकर यांचा मित्र मार्कस कुटोने केलेले वक्तव्य अधिकच चिंतेचा विषय ठरले आहे.
मार्कसने सांगितले, “मी विनोदच्या घरी जाऊन त्याला १४ वेळा पुनर्वसन केंद्रात दाखल केले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत मला चांगली माहिती आहे, पण उपचारांचा काही उपयोग होत नाही. विनोदच्या वाईट सवयींमुळे त्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या समस्यांचे स्वरूप गंभीर आहे, आणि पुनर्वसनही त्याच्या सुधारासाठी पुरेसे ठरत नाही.”
मार्कस हा सचिन आणि कांबळीचा लहानपणीचा मित्र असून त्याने पंचगिरी क्षेत्रात करिअर केले आहे. मार्कस आणि त्याचा भाऊ रिकी हे दोघेही कांबळीच्या तब्येतीची सतत विचारपूस करत असतात. मात्र, मित्रांच्या या प्रयत्नांना कांबळीचा पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
कांबळीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून त्याला या अवस्थेतून बाहेर काढणे हा मोठा प्रश्न बनला आहे. काही काळापूर्वीही त्याचा रस्त्यावरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावरून त्याच्या बिकट परिस्थितीची कल्पना येते. मित्र मंडळी त्याला मदत करत आहेत, पण कांबळी स्वतः यामधून बाहेर पडण्याचा किती प्रयत्न करतो, हेच महत्त्वाचे ठरणार आहे.