Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये शिक्षिकेनं शाळेत रील बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेनं रीलसाठी शाळेतील मुलांचा जीव धोक्यात घातला. तिनं गळ्याभोवती साप ठेवून व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवला.
‘खतरों के खिलाडी, मां के साथ बेटा भी’, असं शिक्षिकेनं स्टेटसमध्ये लिहिलं होतं. या प्रकरणी बीडीओंनी शिक्षिकेला नोटिस पाठवली असून त्यावर उत्तर मागण्यात आलं आहे. शिक्षिकेनं सापासोबतचं व्हॉट्स ऍप स्टेटस हटवलं.
पण तिच्या संपर्कात असलेल्या कोणीतरी याचा स्टेटसचा स्क्रिनशॉट काढला. तो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला. बेसिक शिक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेवर भाष्य केलेलं नाही. घटना अमरोहामधील गजरोलामधील आहे.
सुलतानठेर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका निशू यांनी शाळेत प्रात्यक्षिक ठेवलं होतं. त्यासाठी एका गारुड्याला साप घेऊन बोलावलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांना साप दाखवला. या दरम्यान त्यांनी एक साप गळ्याभोवती ठेवला. त्यानंतर त्यांनी फोटो काढून घेतले.
निशू यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच स्वत:च्या मुलाच्या गळ्याभोवतीही साप गुंडाळला आणि फोटो काढले. या फोटोंचे रील बनवून शिक्षिकेनं व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवला. निशू यांच्या संपर्कातली कोणीतरी या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्षिकेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.