Venezuela accident : भरधाव ट्रक थेट गाड्या आणि बसवर आदळला, रस्त्यावर आगीचे लोट; 16 जण जागीच ठार; थरकाप उडवणारी घटना

Venezuela accident : व्हेनेझुएलामध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. वेगवान ट्रकने कार आणि बसला धडक दिल्याने हा अपघात झाला.

असे देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला सांगितले. ही टक्कर इतकी भीषण होती की कारने पेट घेतला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या अपघातानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

देशाची पूर्व राजधानी कॅराकसला जोडणाऱ्या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला, असे गोन्झालेस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.’

एका अधिकाऱ्याने सांगितले की, वेगवान ट्रकने रस्त्यावरील अनेक कार आणि बसेसला धडक दिली. या धडकेत एकूण 17 वाहनांचे नुकसान झाले. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रस्त्याच्या दुतर्फा ज्वाळा दिसत आहेत.

यावरून हा अपघात किती धोकादायक होता, याचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याचे पेरेझ अँपुएडा यांनी सांगितले. मात्र या अपघातात जीवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.