Madhya Pradesh Trains : ट्रेनमध्ये खिडकी शेजारी बसलेल्या तरुणाचा मृत्यू तरी कोणाला कळलंच नाही; ट्रेन ३०० किमी धावली अन् नंतर…

Madhya Pradesh Trains : मध्य प्रदेशात ट्रेनच्या जनरल बोगीतून प्रवास करताना थंडीमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांचे त्याच्याकडे बराच वेळ लक्ष गेले नाही. हे प्रकरण कामायनी एक्स्प्रेसचे आहे ज्यात हा तरुण सिंगल विंडो सीटवर बसून प्रवास करत होता.

बैतूल येथील रहिवासी असलेला हा प्रवासी जनरल बोगीच्या सिंगल विंडो सीटवर बसला होता. दरम्यान, थंडीमुळे या तरुणाचा सीटवर बसूनच मृत्यू झाला, मात्र शेजारी बसलेल्या प्रवाशांच्या ते लक्षातही आले नाही.

लोकांना वाटले की तो सीटवर बसून झोपला आहे. यावेळी ट्रेनने सुमारे 303 किलोमीटरचे अंतर कापले आणि तरुणाचा मृतदेह सीटवरच पडून राहिला. इटारसीहून ट्रेन दमोहला पोहोचली तेव्हा तरुणाच्या अंगात कोणतीही हालचाल दिसत नसून कानात इअरफोन असल्याने लोकांना संशय आला.

बऱ्याच वेळानंतर त्या बोगीत उपस्थित प्रवाशांना मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी रेल्वे कंट्रोलला फोन करून माहिती दिली. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता ट्रेन दमोह स्थानकात आल्यानंतर तरुणाचा मृतदेह रेल्वेतून बाहेर काढण्यात आला.

तरुणाकडे सापडलेल्या तिकीटावरून ते बैतूलपर्यंत असल्याचे दिसून आले. इटारसीहून बैतूलला जाण्यासाठी त्यांनी ट्रेन पकडली होती, मात्र घरी पोहोचण्यापूर्वी ट्रेनमध्ये प्रवास करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

तपासाअंती डॉक्टरांनी थंडीमुळे झालेल्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर जीआरपीने त्यांच्याजवळ सापडलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली, त्यानंतर कुटुंबीयांनी सायंकाळी दमोह गाठून मृतदेह सोबत नेला.

कुटुंबीयांनी सांगितले की, युवक एसी कंपनीत कामाला होता आणि त्या संबंधाने तो चनेरा येथे गेला होता. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्यांच्या कुटुंबीयांशीही बोलणे झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.