…तर भर चौकात नागडा करून मारू, तुरुंगात टाकू, राम सातपुतेचा मोहिते पाटलांवर हल्ला

रविवारी (8 डिसेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत महायुती सरकारवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी (10 डिसेंबर) भाजपने मारकडवाडीत शक्तीप्रदर्शन करत महाविकास आघाडीवर पलटवार केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आणि माजी आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडीवर कठोर शब्दांत टीका करत मोहिते पाटील कुटुंबाला लक्ष्य केलं.

भाजप नेते राम सातपुते यांनी आपल्या भाषणात मोहिते पाटलांवर थेट आरोप करत त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. सातपुते म्हणाले, “शंकर सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमल्याशिवाय राहणार नाही, यशवंत साखर कारखान्यावरही चौकशी होईल. सुमित्रा बँक आणि विजय मल्टीस्टेट बँक बुडवण्यामागे मोहिते पाटलांचा हात आहे. त्यांच्या विरोधात कारवाई केली नाही, तर मी माझं नाव बदलून टाकीन.”

रणजीतसिंह मोहिते पाटलांवर अप्रत्यक्ष टीका:
रणजीतसिंह मोहिते पाटलांचा उल्लेख न करता सातपुते म्हणाले, “ज्यांनी निवडणुकीत विरोधात काम करून आता भाजपच्या नेत्यांचे पाय धरले आहेत, त्यांनी लाज असेल तर राजीनामा द्यावा. गद्दारांना माफी मिळणार नाही, हे फडणवीस साहेबांना कळवा.”

महाविकास आघाडीवर आरोप:
सातपुते पुढे म्हणाले, “मोहिते पाटलांच्या चमच्यांनी सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवणं थांबवावं. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना भर चौकात शिक्षा केली जाईल. राम सातपुते कुणाला घाबरणारा कार्यकर्ता नाही,” अशा शब्दांत त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.

शरद पवारांच्या सभेचा संदर्भ:
रविवारी शरद पवार यांच्या सभेदरम्यान शरद पवार गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावर भाष्य करताना सातपुते यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आणि त्यांना इशारा दिला.

मारकडवाडीत राजकीय संघर्ष तीव्र:
भाजपच्या शक्तीप्रदर्शनानंतर मारकडवाडीतील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. शरद पवार यांच्या टीकेला भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या वादाला नवा कलाटणी मिळाली आहे.