Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवले, अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा,राजीनामा देताना म्हणाले…
Dhananjay Munde : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक
फोटो व्हायरल झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. याच बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय झाला आणि शेवटी त्यांनी सकाळी राजीनामा सादर केला.
राजीनाम्यासाठी वाढता दबाव
गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढत चालला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही “राजीनाम्याचा निर्णय मुंडे स्वतः घेतील” असे सूचक वक्तव्य केले होते.
फोटो व्हायरल होताच संतापाची लाट
संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही अत्यंत भीषण फोटो समोर आल्याने जनतेमध्ये प्रचंड संताप उसळला. या फोटोंमुळे देशमुख यांची हत्या किती क्रूर पद्धतीने करण्यात आली, हे स्पष्ट झाले. हत्येच्या कटात मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सीआयडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले. त्यामुळेच मुंडेंवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव वाढला होता.
धनंजय देशमुख भावनिक, मनोज जरांगे यांची भेट
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी या प्रकरणावर अजूनही गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळीच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे पोहोचले आणि त्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी भावनावश झालेले धनंजय देशमुख ढसाढसा रडताना दिसले.
पुढील राजकीय घडामोडींवर लक्ष
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पुढील कारवाईसंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, यापुढील घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.